
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कार्यकर्ते आक्रमक झाले असून आगामी काळात जिल्ह्यातील कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊन कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात 5 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे.
31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 रोजी गणेशोत्सव सण साजरा करण्यात येणार आहे. त्यादरम्यान मोठया प्रमाणात चाकरमानी कोकणात येणार आहेत. त्यादरम्यान त्यांच्यातील जुने वादविवादावरुन भांडणतंटा होऊन कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ व आजूबाजूच्या परिसरात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पास तेथील काही गावांचा विरोध असून त्यानुषंगाने मागील 6 महिन्यांपासून वेगवेगळया स्वरुपात आंदोलने करुन विरोध दर्शविण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने देखील कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सन 1951 चा कायदा 22 वा नुसार 22 ऑगस्ट 2022 रोजी चे 00.01 वा. पासून ते 05 सप्टेंबर 2022 रोजी 24.00 वाजेपर्यंत जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये वरील कालावधीत खालील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे.
शारिरीक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्रे फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, अगर सोंग आणणे, अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांनी विनापरवानगी एकत्र येणे या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.
सदरचा आदेश अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्नसोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंचा इत्यादी या बाबींना लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही, असे अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.































































