प्रॉपर्टीच्या वादातून मालकिणीने काढला केअरटेकरचा काटा

murder-knife

प्रॉपर्टीचे काम पाहणारा केअर टेकर सतत ढवळाढवळ करतो यामुळे संतापलेल्या मालकिणीने दीड लाखांची सुपारी देऊन त्याचा काटा काढल्याची घटना येथील घोडबंदर परिसरात घडली. या घटनेने चार महिन्यांपूर्वी गायमुख खाडीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले असून हा मृतदेह त्या केअर टेकरचाच असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी प्रॉपर्टीची मालकीण कल्पना नागलकर हिच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

तानाजी जावीर हे गेल्या 12 वर्षांपासून कल्पना बळीराम नागलकर हिच्या घरी चालकाचे काम करीत होते. त्याच वेळी नागलकर यांच्या प्रॉपर्टीची देखभाल करण्याचे कामही जावीर करत असत. त्यामुळे अनेकदा जावीर आणि कल्पना नागलकर यांच्यात वाद होऊन भांडणे विकोपाला जात. त्यामुळे कल्पना नागलकर यांनी जावीर यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तिने जवळच्याच झोपडपट्टीत भगतीणीचे काम करणाऱया गीता आरोलकरकडे याबाबत सांगताच गीता हिने संतोष घुगरे व गणेश मुरुडकर या दोन मारेकऱयांची कल्पनाशी गाठ घालून दिली. त्यानुसार कल्पनाने त्यांना 1 लाख 40 हजार रुपयांची सुपारी दिली. त्यानंतर मारेकऱयांनी जावीर यांच्याशी परिचय वाढवला आणि त्यांना गायमुखजवळ दारू पिण्यासाठी बोलावले. या दोघांनी दारूत विष मिसळून जावीर यांची हत्या केली.

कल्याणमध्ये लपलेल्या मारेकऱ्याला उचलले

जावीर यांचे मोठे भाऊ अनिल यांनी आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस निरीक्षक (गुन्हे) अविनाश काळदाते, पोलीस निरीक्षक (प्रशासन) जयराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर जाधव, पोलीस उपनिरीक्षक पुलदीप मोरे यांच्यासह पथकाने शोधमोहीम सुरू केली. मृत तानाजी जावीर यांच्या कपडय़ांवरून अत्यंत कसोशीने तपास केला. खबऱयाकडून संतोष घुगरे याने एकाची हत्या केली असून तो कल्याणमध्ये लपून बसल्याची माहिती किशोर खैरनार यांना मिळाली. त्यानंतर संतोषला कल्याणमधून उचलल्यानंतर त्याने तानाजी यांची हत्या आपणच केली असून त्यासाठी कल्पना नागलकर यांनी दीड लाखांची सुपारी दिल्याची कबुली दिली.

आपली प्रतिक्रिया द्या