सीएए, एनआरसीविरोधात नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवीत सीएए व एनआरसी रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील जागरुक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाजासह इतर नागरिकही सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज व महापुरुषांच्या प्रतिमा घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले होते.

शुक्रवारी दुपारी 3 वाजता बारा इमाम कोठला येथून या मोर्चाची सुरुवात झाली. संविधान विरोधी व देशाच्या एकात्मतेला बाधा आनणार्‍या सीएए व एनआरसीला विरोध दर्शविण्यासाठी आंदोलकांनी काळ्या फिती बांधून व काळे ध्वज फडकविले. भारत देश के चार सिपाही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई…. यासह सीएए व एनआरसी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, टिपू सुलतान, महात्मा फुले, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, मौलाना आझाद, भगतसिंह आदी महापुरुषांच्या वेशभुषेत मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. तर काही नागरिकांनी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. नगर-संभाजीनगर महामार्गावरुन ईदगाह मैदान, स्टेट बँक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरुन मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा हजर होता. तर मोर्चावर व्हिडिओ कॅमेरे व ड्रोनची करडी नजर होती. मोर्चाच्या नियोजनासाठी नगर-संभाजीनगर रस्त्यावरील वाहतुक दुसर्‍या मार्गांने वळविण्यात आली होती.

या मोर्चात जमिअत उलेमा ए हिंद, अहेले सुन्नत वल जमाअत, तबलिग जमाअत, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जमाअते अहेले हदिस, बहुजन क्रांती मोर्चा, जमाअते ईस्लामे हिंद, वहिदते ईस्लामे, महेदिया जमाअत, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई), वंचित बहुजन आघाडी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, अल्पसंख्यांक प्रबोधन मंच, उर्जिता फाऊंडेशन, नगर इतिहास प्रेमी मंडळ, रहेमत सुलतान फाऊंडेशन आदी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला असता मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी मौलानांसह प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. मोर्चाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन दिले.