मराठा आरक्षणासाठी मुंबईत ठिय्या आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्याच्या विविध भागांमध्ये मराठा संघटनांची आंदोलने सुरू आहेत. मुंबईतही रविवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशी खबरदारी घेऊन हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लालबाग येथे आंदोलनकर्त्यांनी ‘कायद्यात टिकणारे आरक्षण गेले कुठे?’ असा सवाल करणारे बॅनर्स झळकवले. मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजन घाग यांनी दिला.

घाटकोपर पूर्व येथील पंतनगर पोलीस ठाण्याजवळील जंक्शनवर मराठा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत घोषणा दिल्या. जोगेश्वरीच्या शामनगर परिसरात जोरदार घोषणाबाजी केली गेली. कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेतले होते आणि काळ्या रिबीन लावल्या होत्या. चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात आंदोलन केले गेले.

लालबाग, वरळी, दादर, गिरगाव, विलेपार्ले, जोगेश्वरी, चेंबूर, कडाळा, मानखुर्द, कुर्ला, वांद्रे, विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, पवई, मुलुंड, कांदिवली, बोरीवली आदी ठिकाणी मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुले आणि वयोवृध्दांना आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

डबेवालेही आंदोलनात सहभागी

मुंबईतील डबेवालेही या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. 99 टक्के डबेवाले हे मराठा समाजातील असून आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आमच्या मुलांच्या भवितव्यावर परिणाम होणार आहे. मराठा आरक्षण कायम रहावे यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत असे यावेळी डबेवाले संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. मराठा विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय? 12500 पोलिसांची भरती रद्द झालीच पाहिजे असे फलक यावेळी उंचावण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या