उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी अडीचशे कोटींचा निधी देऊ, जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी दोनशे ते अडीचशे कोटी रुपये देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिले.

दरम्यान, म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घुसखोरी आढळल्यास रेंट कलेक्टरला घरी बसवण्याची घोषणा त्यांनी केली. मुंबईतील संक्रमण शिबिरातील घुसखोरी आणि इतर प्रश्नांसंदर्भात काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. मुंबईत 16 हजार उपकरप्राप्त इमारती आहे. या इमारतींच्या दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपयांचा सध्याचा निधी कमी आहे. इमारत कोसळून दुर्घटना झाल्यावर पाच लाख रुपये दिले जातात. त्यापेक्षा इमारत दुरुस्तीसाठी निधी वाढवण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेताना अतुल भातखळकर यांनी म्हाडाच्या एजंटचा प्रश्न मांडला.

पालिकेच्या कार्यालयात आरटीआय कार्यकर्त्यांची यादी लावली जाते त्याच धर्तीवर म्हाडाच्या कार्यालयात एजंटची यादी लावण्याची सूचना त्यांनी केली.  या लक्षवेधीला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले. म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घुसखोरी वाढल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. घसुखोरी रोखण्यासाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा त्यांनी यावेळी केली. म्हाडाचे एजंट गिऱहाईक शोधण्यासाठी जाळे विणतो. संक्रमण शिबिरात घुसखोर आढळल्यास रेंट कलेक्टरला घरी बसवण्यात येईल. संक्रमण शिबिरात तीस ते चाळीस टक्के घुसखोर आहेत. त्यांना बाहेर काढावे लागेल. काही घुसखोरांना कालांतराने सरकारनेच मान्यता दिली आहे, पण हे कधी तरी बंद करावे लागेल. म्हाडाच्या कार्यालयाबाहेर एजंटची नावे लावली जातील.  म्हाडातील 523 रिक्त पदे तीन महिन्यांत भरण्यात येतील  असे आव्हाड म्हणाले.