सार्वजनिक बँकांतील कर्मचाऱ्यांचे काम बंद

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंडियन बँक असोसिएशनने सार्वजनिक बँक कर्मचाऱयांना केवळ दोन टक्के पगारवाढ देऊ केल्याच्या निषेधार्थ देशभरातील लाखो कर्मचाऱयांनी आजपासून दोनदिवसीय संप पुकारला आहे. महिनाअखेरीस पुकारलेल्या या संपामुळे सर्वसामान्यांची गैरसोय झाली आहे. मात्र, आयसीआयसीआय, एचडीएफसी, ऍक्सिस या खासगी बँका संपात सहभागी नसल्यामुळे या बँकांत धनादेश वटण्याव्यतिरिक्त अन्य कामे सुरू होती. देशातील ९ बँकांच्या युनियनची शिखर संस्था असलेल्या युनायटेड फोरम आँफ बँकिंग युनियन्सने (यूएफबीयू) संपाची हाक दिली आहे.

गेल्या वेतन करारावेळी १५ टक्के वाढ देण्यात आली होती. यावेळी अनेक वेळा चर्चा करूनही तोडगा न निघाल्यामुळे संप पुकारल्याचे ‘एआयबीईए’चे सरचिटणीस सी. एच. वेंकटाचलम यांनी सांगितले. तर यावेळी केवळ दोन टक्के वाढ आयबीएने देऊ करून सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱयांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला संपावर जाण्याखेरीज पर्याय उरला नाही, असे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे सहसरचिटणीस रविंदर गुप्ता यांनी सागितले. जनधन, मुद्रा योजना आणि नोटाबंदीमुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक बोजा पडला आहे, असेही ते म्हणाले. आजच्या संपामुळे पगार वितरण, एटीएम यांच्या सेवांवर परिणाम झाला. याखेरीज ठेवींचे नूतनीकरण, सरकारी कोषागारांचे काम तसेच शेअरबाजारातील व्यवहार यावर परिणाम झाला. या संपामुळे सार्वजनिक क्षेत्रातील २१ बँकांच्या ८५ हजार शाखांचे कामकाज बंद होते.

बडय़ा कर्जबुडव्यांमुळे बँक कर्मचाऱयांची पगारवाढ थांबवण्यात आली आहे. बँकांच्या शाखांची संख्या वाढल्याने कोटय़वधींचा नफा वाढला आहे. असे असताना कर्मचाऱयांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मात्र आता पगारवाढ आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि यानंतरही दखल घेतली गेली नाही तर बेमुदत संपासह सर्व कृती कार्यक्रम हाती घेण्यात येईल.
देविदास तुळजापूरकर, निमंत्रक, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स

बँका अडचणीत असताना ठेवीदारांच्या पैशाला हात घालण्याचे अधिकार देणाऱ्या प्रस्तावित ‘एफआरडीआय’ कायद्याला आमचा विरोध आहे. सरकारचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. तर दोन टक्के पगारवाढ नको, तर १५ टक्के द्यायला हवी. त्यामुळे इंडियन बँक असोसिएशनने चर्चा करून हे प्रश्न सोडवले पाहिजेत.
विश्वास उटगी, बँकिंग तज्ञ,
कर्मचारी नेते

आपली प्रतिक्रिया द्या