
पुद्दुचेरीत काँग्रेसचे सरकार पडल्यानंतर तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी सुरु झाली आहे. पुद्दुचेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रस्ताव पाठवला आहे.
पुद्दुचेरीत लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहेत. काँग्रेसचे सरकार पडल्यानंतर विरोधी पक्षानेही सरकार स्थापन करण्याचा दावा केला नाही. यामुळे येथे राष्ट्रपती राजवट लागू करणायचा प्रस्ताव केंद्र सरकारने राष्ट्रपतींकडे पाठवला आहे.
पुद्दुचेरी विधानसभेच्या 33 सदस्यांपैकी 30 निवडून आलेले आमदार असतात, तर 3 सदस्यांची नियुक्ती केंद्र सरकारकडून करण्यात येते. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागा जिकंल्या होत्या. एका आमदाराला पक्षबदल कायद्यानुसार गेल्या वर्षी अपात्र घोषित करण्यात आले होते. तर आतापर्यंत पाच आमदारांनी राजीनामा दिला आहे.
डीएमकेने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यांचे तीन आमदार आहेत. मात्र, त्यापैकी एकाने रविवारी राजीनामा दिला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत काँग्रेसकडे 11 आमदारच आहेत. सहा आमदारांचा राजीनामा आणि एक अपात्र आमदार यामुळे विधानसभेची सदस्यसंख्या 26 झाली आहे. प्रमुख विरोधी पक्ष ऑल इंडिया एनआर काँग्रेसकडे 7 आमदार आणि एआयडीएमकेकडे 4 आमदार आहेत. तर भाजपचे नियुक्त केलेले 3 आमदार आहेत. त्यामुळे सरकारकडे अध्यक्षासंह 12 आमदार तर विरोधी पक्षांकडे 14 आमदार आहेत.
दरम्यान, पुद्दुचेरी विधानसभेत काँग्रेस बहुमत सिद्ध करू शकली नसल्याने पुद्दुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. सोमवारी विधानसभा अध्यक्षांनी सरकारकडे बहुमत नसल्याचे जाहीर केले. यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी आपला राजीनामा उपराज्यपालांना सोपवला केला.


























































