दोन हजारांवर पोलीस; सीसीटीव्हींचा वॉच, ग्रामिण पोलिसांकडून तगडा बंदोबस्त

गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पुणे ग्रामिण पोलिसांकडून चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक पोलीस तैनात राहणार आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्हींचा वॉच राहणार असून संवेदनशील ठिकाणी अतिरीक्त फौजफाटा देखील असणार आहे.

पुण्याच्या ग्रामिण भागात सार्वजनिक गणपती मंडळांसह घरगुती, एक गाव एक गणपती असे मंडळे असून उद्या (दि.28) विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. जिल्ह्यात २ हजार ८७२ सार्वजनिक गणेश मंडळे, 204 एक गाव एक गणपती तर ६४ हजार ५२४ घरगुती गणपती विसर्जन होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामिण पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विसर्जन शांततेत पार पडण्याकरीता गणेश मंडळांसह ढोल ताशा पथके, शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, पोलीस मित्रांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणूकीच्या दिवशीच ईद ए मिलाद हा सण आल्याने जिल्हा प्रशासनाने बैठका घेवून ईद मिलादच्या मिरवणूका अनंत चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी घेण्यास मुस्लिम बांधवांनी मान्य केले आहे. विसर्जन मिरवणूकीकरीता आखण्यात आलेला बंदोबस्त हा गुरुवार (दि.२८) पासून विसर्जन मिरवणूका संपेपर्यंत असणार आहे. जिल्ह्याती प्रमुख विसर्जन मार्गावर व विसर्जन ठिखाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून यामाध्यमातून संबंधीत ठिकाणी करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
—-
असा आहे जिल्ह्यातील बंदोबस्त
पोलीस अधिक्षक – १
अप्पर पोलीस अधिक्षक – २
पोलीस उप अधिक्षक – ११
पीआय ते पीएसआय – २२०
पोलीस अंमलदार – १ हजार ६३६
होमगार्ड – ५००
एस.आर.पी.एफ – १ कंपनी
आर. पी. सी – ४
क्यू.आर.टी – २
——–
गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी दोन हजारांहून अधिक बंदोबस्त असणार आहे. काही संवेदनशील ठिकाणी अतिरीक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
– अंकीत गोयल, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण.