
>> मेधा पालकर
विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात विद्यादानाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी अभिजीत पोखर्णीकर या तरुणाने अनोखा मार्ग स्वीकारला. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर राहणाऱ्या शिक्षणापासून वंचित मुलांपर्यंत पोहोचून अभिजीत त्यांना अभ्यासासाठी मदत करत आहे. विशेष म्हणजे यातील काही मुलांनी दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून अभिजीत ‘दादा’ने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवला आहे.
अभिजीत पोखर्णीकर हा मूळचा पुण्यातील तरुण. त्याला प्रत्येक सिग्नलवर दिसणाऱ्या लहान मुलांना शिकवायचे का, त्यांना कोणी शाळेत प्रवेश देत असेल का, की त्यांचे स्वप्न अपूर्णच राहते या सतत पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना अभिजीत या मुलांपर्यंत पोहोचला आणि त्याने या मुलांच्या शिक्षणाची धुरा हाती घेतली. या सगळ्यांमध्ये त्याला अनेकांचं सहकार्य लाभत गेले. बघता बघता 120 समविचारी मित्रही या कामात जोडले गेले. मुलांच्या लाडक्या ‘अभिजीत दादा’ने शाळेत 1700 हून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या परिसरातून गोळा केले आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा विडा उचलला. या वर्षी या शाळेतील दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत.
पाषाण, आकुर्डी, पिरंगुट, मार्केट यार्ड, सारसबाग आणि झेड ब्रिजच्या खाली नदीपात्रात, विश्रांतवाडी या परिसरांत ही शाळा भरते. मुंबई, अमरावती या भागांतही ही दादाची शाळा सुरू झाली आहे. या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडेच नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेसुद्धा लक्ष दिले जाते. अनुभवांची शिदोरी उलगडताना अभिजीत म्हणाला, “मुले गोळा करताना किंवा त्याच्या पालकांना शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे पटवून देणे खूप अवघड काम आहे. मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना गाणी व खेळाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे. या मुलांना अभ्यासाप्रति आवड असून एकदा शिकवलेली गोष्ट डोक्यात ठेवून ती पूर्ण करत आहेत.”
प्रामुख्याने या विद्यार्थ्यांकडे पुरेशी कागदपत्रे नसल्याने प्रवेश कोणत्या धर्तीवर करावयाचा अशाही समस्या निर्माण होतात. या वेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पर्यायी मार्ग काढावा लागतो. शिक्षणाचा वसा हाती घेऊन अभिजीत याच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र दहावीनंतर शिक्षण, त्याची फी भरण्यासाठी समाजातील दानशूर पुढे आले तर नक्कीच या मुलांना उच्च शिक्षण घेता येईल. सध्या बारावीची परीक्षा मुलांनी दिली आहे. अभिजीत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या मुलांना स्वखर्चाने शिकविले आहे. मात्र याच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आता सरकारी मदत झाली तर मुलांचे शिक्षण होईल.



























































