‘सीएमई’मध्ये अपघात; दोन जवानांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगमध्ये (सीएमई) पूल बांधणीच्या प्रात्यक्षिकादरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला तर नऊजण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास दापोडीतील सीएमई कॅम्पसच्या ‘ब्रिज हार्ड’मध्ये घडली. जखमींना खडकी आणि वानवडीतील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी लष्कराने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ नेमली आहे.

नाईक भिका खंडू वाघमोडे (28, रा. दौंड) आणि लान्स हवालदार पी. के. संजीवन (29, रा. पलक्कड, केरळ) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन जवानांची नावे आहेत, तर मेजर सूर्यजीत सिंग, सुभेदार पी. षण्मुगम, नाईक डी. सी. शर्मा, हकालदार परमजीत सिंग, नाईक गुरपीत सिंग यांच्याकर खडकी लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाईक बी. पी. गोरे, नाईक शरद खोले, नाईक देवेंद्रसिंग बिस्ट यांच्यावर पुणे कमांड रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर नाईक मनदीप सिंग या जवानावर सीएमई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिदुस्थानी सैन्य दलाचे दापोडी येथे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) आहे. 3 हजार 600 एकरांच्या विस्तीर्ण जागेत हे कॉलेज वसले आहे.