पुण्यात किरकोळ कारणावरून हॉटेल मालकासह कामगारावर वार, साहित्याची तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा राग मनामध्ये धरून टोळक्याने हॉटेल चालकासह त्यांच्या कामगारावर वार करून जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. मयूर मते आणि इसराफील, अश्फाक अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात टोळक्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धायरीतील गणेशनगरमध्ये मयूर यांचे गारवा बिर्याणी हॉटेल आहे. शनिवरी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आलेल्या एका ग्राहकासोबत त्यांची किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्याचा राग आल्यामुळे संबंधिताने इतर साथीदारांना बोलावून हॉटेलमध्ये प्रवेश केला. टोळक्याने हत्यार काढून मयूर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगार इसराफील मध्ये पडल्यामुळे त्याच्या डाव्या हातावर वार झाला. त्यानंतर टोळक्याने पुन्हा मयूरवर वार करून जखमी केले. त्यांच्या हॉटेलमधील बिर्याणीचे पातेले, झाकणे, खुर्च्या, ट्रे फेकून मारले. त्यात मयूर आणि त्यांचे कामगार अश्फाक व इसराफील यांना जखमी झाले. त्याशिवाय हॉटेलबाहेर जमलेल्या लोकांना आणि आजूबाजूच्या दुकानदारांना शिवीगाळ करून दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर तपास करीत आहेत.