पुणे – बालेवाडीतील लेबर कॅम्पमध्ये पाच घरांमध्ये घरफोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील बालेवाडीतील किवेस्ट कन्स्ट्रक्शन साईटच्या लेबर कॅम्पमधील पाच खोल्यांमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून ३६ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ऐन कोरोना कालावधीत पै-पै जमा करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्यांची चोरी झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय सदाशिव पेठेत बंद फ्लॅट फोडून 65 हजार रूपयांच्या ऐवजाची चोरी करण्यात आली आहे.

मोहम्मद आलाम (वय 25, रा. किवेस्ट कन्स्ट्रक्शन साईट, बालेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालेवाडी येथे किवेस्ट कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे. याठिकाणी काम करणाऱ्या मजुरांसाठी राहण्यासाठी खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.

गुरूवारी सकाळी सात वाजता नेहमी प्रमाणे सर्व कामगार कामावर गेले. त्यानंतर चोरट्यांनी मोहमंद यांच्या खोलीसह पाच खोल्यांचे कुलुप उचकटून 10 हजार रूपयांची रोकड चोरून नेली. चोरट्यांनी आलम यांचे पाच हजार, आफताब आलाम यांचे तीन हजार, मिनाज यांचे पाच हजार मोहम्मद जाफर यांचे तीन हजार, मोहंमद जहीर, आकीम आलम, जावेद आलम, अब्दुल बारी, सुनिल कुमार या सर्वांचे मिळून 36 हजार रूपये चोरून नेले. सर्व कामगार दुपारी बाराच्या सुमारास कामावरून आल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे चोरून नेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सर्व कामगार बाहेरील राज्यातील आहेत. कोरोनाच्या महामारीत देखील गावापासून दूर बांधकाम साईटवर पैशासाठी काम करत आहेत. त्यांचे पैसे चोरून नेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दुसऱ्या घटनेत सदाशिव पेठेत राहणाऱ्या अलकनंदा अशोक वाडेकर (72) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी 60 हजार रूपये रोख आणि सोन्याचे दागिने असा 65 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वाडेकर 14 एप्रिलला घर बंद करून नातेवाईकाकडे गेल्या होत्या. दोन जून रोजी घरी आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार झाल्याचे दिसून आला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.