
सातारा औद्योगिक वसाहत परिसरातील जानाई-मळाई देवीचे दर्शन घेऊन घरी परतत असताना एका दाम्पत्याच्या दुचाकीला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ‘डी-मार्ट’जवळ अपघात झाला. महामार्गाच्या कडेला असलेल्या कठडय़ाला दुचाकी धडकून झालेल्या या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
भाऊसाहेब कृष्णा येळे (वय 35) असे मृताचे नाव असून, पत्नी सविता येळे (वय 30, दोघेही रा. लिंब, ता. सातारा) या जखमी झाल्या आहेत.
भाऊसाहेब हे पत्नी सवितासोबत सातारा येथील जानाई-मळाई देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या दुचाकीवरून लिंब येथील घरी परत जात होते. मात्र, राष्ट्रीय महामार्गावर असणाऱया डी-मार्टजवळ त्यांची दुचाकी कठडय़ाला धडकली. यामुळे दुचाकीवरून पडून भाऊसाहेब येळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी सविता या जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.






























































