
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासाठी तयार केलेल्या सेवा रस्त्याच्या आज पहिल्याच दिवसाच्या वाहतुकीने चिंधडय़ा उडाल्याने वाहनधारक हैराण झाले. पहिल्याच दिवशी ही तऱ्हा म्हटल्यावर पूल पूर्ण होईपर्यंत काय हाल सोसावे लागतील याचा ‘ट्रेलर’च वाहनधारकांना यानिमित्ताने पहायला मिळाला.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल या टप्प्याच्या सहापदरीकरणाच्या कामाला अद्यापि मुहूर्त लागलेला नाही, पण या महामार्गावर जिथे नेहमी काही ना काही अपघात होत असतात, अशी ठिकाणे ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे सध्या काम हाती घेण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात मसूर फाटा, इंदोली फाटा तसेच काशिळ या ठिकाणी हे उड्डाणपूल होणार आहेत. हे काम सुरू करण्याआधी वाहतुकीसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्ते तयार करण्याचे काम गेले काही दिवस सुरू होते.
यातील इंदोली फाटा येथील पुलाचे काम सुरू करण्यासाठी आज सेवा रस्त्यावरून महामार्गावरील वाहतूक वळवली गेली. मात्र, अवजड वाहतुकीपुढे आज पहिल्याच दिवशी सेवा रस्त्याने नांगी टाकली. दुपारपर्यंतच हा रस्ता बहुतेक ठिकाणी खचल्याचे दिसून आले. पहिल्याच दिवशी या रस्त्याच्या चिंधडय़ा उडाल्याने वाहनधारकांची निराशा झाली. येथून वाहने नेताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती.


























































