
पुणे ते बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अतिवेगवान वाहनांवर महामार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईतून मुंबई, पुणे, गोवा व बंगळूर या मोठ्या शहरांतील वाहनधारकांची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महामार्गावर दोन महिन्यांत 81 अतिवेगवान वाहनांचे अपघात झाले असून 35 जणांना जीव गमावावा लागला, तर 104 जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिसांनी 20 हजारहून अधिक वेगवान वाहनांवर केलेल्या कारवाईत 2 कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे. तरीही वाहनांचा वेग काही कमी होताना दिसत नाही. महामार्गावर वाहनांना ताशी 90 किलोमीटरच्या वेगाला परवानगी आहे. यावरील वेगवान वाहनांवर कारवाई केली जाते. कराड तालुक्यातील आटके टप्पा, पाचवड फाटा, वहागाव येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत पुणे, कोकणसह गोव्या नजीकच्या वाहनांचा अतिवेगच धोक्याचा ठरला आहे.
वहागाव येथे झालेल्या अपघातातील वाहनांचा वेग ताशी 165 किलोमीटरचा होता. अपघातानंतर कारचे स्पीडॅमीटर ताशी 165 किलोमीटरवर लॉक झाले होते. वाहन पास करताना अनेक अपघातांची नोंद आहे. अपघातग्रस्त वेगवान वाहने कोकण, मुंबई, गोवा, पुणे येथील असल्याचे अपघातातील वाहनांवरून स्पष्ट झाले आहे. महमार्गावर वेगवान वाहनांत मुंबई, पुणे, गोवा व बंगळूरमधील मोठ्या शहरांतील वाहनधारकांची संख्या सर्वाधिक आहे.
अपघात होऊ नयेत, यासाठी महामार्ग पोलिस नेहमी प्रयत्न करतात. मात्र, वेगावर मनाचा ताबा येत नाही. तोपर्यंत वाहनांचाही वेग कमी होणार नाही अशी स्थिती आहे. यासाठी जागृतीच्या पर्यायासह स्वतःची जबाबदारी ओळखून वाहन चालविणे महत्त्वाचे आहे.
-रघुनाथ कळके, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग पोलीस, कराड



























































