
फ्लॅट बुकिंगसाठी रक्कम स्वीकारून ताबा न देता एका बांधकाम व्यावसायिकाने तरूणाची 16 लाख 45 हजारांची फसवणूक केली. ही घटना जून 2019 ते डिसेंबर 2020 कालावधीत धायरी येथे घडली.
याप्रकरणी प्रमोटर्स अॅण्ड बिल्डर्स कंपनीच्या मालकाविरूद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील पोतदार (वय 37, रा. चौपाड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील यांना पुण्यात फ्लॅट घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी एका मित्राच्या ओळखीतून धायरीतील प्रमोटर्स अॅण्ड बिल्डर्स यांच्याकडे फ्लॅटसाठी बुकिंगचे पैसे जमा केले.
त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने 16 लाख 45 हजार रूपये बांधकाम व्यावसायिकाकडे जमा केले होते. मात्र, प्रमोटर्स अॅण्ड बिल्डरचे मालक यांनी निखील यांना फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.
























































