बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठा आवाज काढल्यामुळे एका तरुणाने बुलेट चालकाकडे रागाने पाहिले. त्यावरून रागाने पाहिलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना चंदननगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी आदिल मलिक, ओमकार भंडारी व इतरांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अब्रार पटेल (वय 20, रा. वडगाव शेरी) याने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पटेल व त्याचे दोन मित्र शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास चंदननगर परिसरातून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीतील आदिल मलिक बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके सारखे आवाज काढत होता. या आवाजामुळे त्रास झाल्यामुळे पटेलने आरोपीकडे रागाने पाहिले. त्याचा आरोपीला राग आल्यामुळे आरोपी व त्याच्या दोन साथीदारांनी कोयता व लाकडी पट्टीने पटेल व त्यांच्या मित्रांना जबर मारहाण केली. याप्रकरणी चंदननगर पोलिस अधिक तपास करत आहे.



























































