भाजपच्या छत्रीची काँग्रेस कार्यालयात दुरुस्ती, गंमतीदार फोटो व्हायरल

पुण्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी छत्री दुरुस्ती उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. 14 जून रोजी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांच्या हस्ते काँग्रेस भवनात सोमवारी हा उपक्रम सुरू करण्यात आला. मोहन जोशी यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे पहिल्याच दिवशी उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिल्याचे सांगितले होते. 19 जूनपर्यंत सकाळी 11 ते 6 या वेळात छत्र्या चकटफू दुरुस्त करुन देण्यात येणार आहेत.

हा उपक्रम हाती घेतल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली होती. छत्री दुरुस्त करण्याऐवजी नवीन छत्री तरी द्यायची होती असे टोमणेही काँग्रेस नेत्यांना हाणण्यात आले. हा उपक्रम सुरू करणाऱ्या जोशी यांनी हीच कल्पना का सुचली याचं उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की ‘सद्यस्थितीत केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक गंडांतर आले. त्यांना हातभार लावण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.’

umbrella-repair-camp-by-congress

कोरोना काळात अनेकांच्या पोटावर पाय आला आहे, अनेकांच्या हातातील रोजीरोटी हिरावून घेतली गेली. अशा लोकांना नवीन छत्री घेणं परवडणारं नाहीये. जुनी छत्री दुरुस्त करायलाही पैसे मोजावे लागतात. ही अडचण काहींना लहान वाटत असली तरी मुसळधार पावसाला जेव्हा सुरू होते तेव्हा डोक्यावर छत्री नसल्यास काय होते याची कल्पना ज्यांनी अनुभवलंय तीच मंडळी करू शकतात. मोडलेली छत्री दुरुस्त झाली तर गरीबांना त्याचा फायदा होईल हा विचार मनात आल्याने हा उपक्रम सुरू केल्याचं सांगण्यात आलं आहे. या उपक्रमातील एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे, यामध्ये कुठल्यातरी भाजप नेत्याने वाटलेली छत्री दुरुस्तीसाठी आल्याचं पाहायला मिळतंय. ही बाब बारीक नजर असलेल्या लोकांच्या नजरेतून सुटलेली नाही

आपली प्रतिक्रिया द्या