
पुणे शहर परिसरात सुरू असलेल्या अवैध धंदे, जुगार, मटका अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईचा धडाका लावल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. गुरुवारी उत्तमनगमधील शिवणे परिसरात खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई करून 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 73 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मागील पंधरा दिवसात शहरातील येरवडा, चंदननगर, वानवडी, मुंढवा, हडपसर, फरासखाना, सिंहगड रोड, उत्तमनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. केवळ शहराच्या मध्यवर्ती भागच नव्हे तर उपनगरात कारवाईचा धडाका लावला आहे. अनेक ठिकाणी करवाई करून जुगार खेळणाऱ्याना ताब्यात घेत मुदेमाल जप्त केला आहे. दोन दिवसांपूर्वीच सामाजिकच्या पथकाने हडपसर भागात सुरू असलेल्या वेष्या व्यवसायाचा पर्दाफाश करत येथून पाच पीडित तरुणींची सुटका केली. तर, एकाला अटक केली आहे. त्यानंतर मुंढव्यातील हॉटेल नाईट रायडर येथे कारवाई करून हुक्का, तंबाखूजन्य पदार्थांच्या साठा जप्त केला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत जाधव यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात येत असून दररोज एका ठिकाणी कारवाई करण्यात येत असल्याने अनेक ठिकाणचे अवैध धंदे बंद झाले आहेत.
…अवैध धंद्यांबाबत रोज तक्रारी
पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या दारू, जूगार, मटका आदी अवैध धंद्याबाबत नागरिकांकडून पोलीस नियंत्रण कक्षाला रोज दोन ते तीन तक्रारी प्राप्त होत आहे. नागरिकांकडून प्राप्त तक्रारी नियंत्रण कक्षामार्पâत संबंधीत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना कळविण्यात येतात. मात्र, यावर पोलीस ठाण्याकडून कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अशा काही प्रकरणात अतिवरिष्ठांनी लक्ष घालून वेळोवेळी हे प्रकार उघडकीस आणले आहेत.


























































