
शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून मोबाईल टॉवरवरील नेटवर्क कव्हरेज करणाऱ्या बेड बँडची चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून 6 बेस बँड, 11 रूसकार्ड, 2 टीआरएक्स, 2 दुचाकी असा मिळून 61 लाख 15 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
सुफरान लतीब राज उर्फ बाबा (वय 40) आणि महेश हनुमंत परीट (वय 24 रा. हडपसर मूळ-सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघेही सराईत चोरटे असून त्यांनी पुणे शहर पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केलेले 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल टॉवरमधील पार्टची चोरी करणारे स्वारगेटमधील कॅनोलजवळ थांबल्याची माहिती पोलीस नाईक विशाल भिलारे, अजित फरांदे, कादिर शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सुफरान आणि महेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून मोबाईल टॉवरवरील फोर जी नेटवर्क कवरेज करणारे बेस बँड चोरून भंगारमध्ये विकल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी भंगार विक्रेता समीरउल्ला अजीमउल्ला शहा याला अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाईल टॉवरवरील 6 बेस बँड, 11 रुस कार्ड आणि दोन टीआरएक्स असा 61 लाखांवर मुद्देमाल जप्त केला.
ही कामरिगी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, यशवंत आंब्रे, किशोर वग्गू, विशाल भिलारे, चेतन गोरे, चंद्रकांत महाजन, अजित फरांदे, निखील जाधव, कादीर शेख यांच्या पथकाने केली.



























































