वकिलावर हल्ला करून लुटणाऱ्या 5 जणांना अटक, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुरक्षा रक्षकांचे थकित 72 हजार रूपये न दिल्यामुळे वकिलावर हल्ला करून त्यांचे वडील आणि कामगाराला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाचजणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. ही घटना 7 मे रोजी पुणे-सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीत घडली होती. हल्लेखोरांकडून दुचाकी आणि मोबाइल असा 37 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

हनुमंत श्रीकांत पाटेकर (वय – 31, रा. पंतनगर, जाधववाडी, चिखली), सुग्रीव भीमराव गायकवाड (वय – 57, रा. म्हेत्रे गार्डन जवळ, चांदणी चौक, चिखली), विनयकुमार आंबिकाप्रसाद यादव (वय – 22, रा. शिंदे वस्ती, रावेत), दिलीप फुलचंद निर्मल (वय – 33, रा. चंदननगर), शत्रुघ्न सुखदेव पोकळे (वय – 35, रा. गणेश नगर, वडगाव शेरी) यांना अटक करण्यात आली आहे. अ‍ॅड. अमित शहा (वय -41, रा. आदिनाथ सोसायटी, स्वारगेट) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अ‍ॅड शहा यांची कात्रज येथे प्राणीमित्र संस्था असून त्यांनी खासगी संस्थेचे सुरक्षारक्षक नियुक्त केले होते. संबंधित एजन्सीचे 72 हजारांची रक्कम न दिल्यामुळे 7 मे ला सकाळी दहाच्या सुमारास आरोपी शहा यांच्या घरात शिरले. त्यांना शिवीगाळ करून वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीची चावी आणि मोबाईल हिसकावून घेतला. कामगारालाही जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील मोबाईल हिसकावून टोळके पसार झाले होते. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक तुषार भोसले, सोमनाथ कांबळे, संदीप साळवे, शिवाजी सरक यांनी केली.