धक्कादायत; पुण्यात अपहरण झालेल्या वकिलाला पेट्रोल टाकून जाळले

शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून अपहरण झालेल्या वकिलाचा खून करुन मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर आरोपींनी मृतदेह ताम्हिणी घाटात टाकल्याचे निष्पन्न झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

जमिनीच्या वादातून वकिलाचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक केलेला एक आरोपी शिवाजीनगर न्यायालयातच वकिली करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कपिल विलास फलके (वय 34, चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28, आष्टी, जि. बीड), रोहित दत्तात्रय शेंडे (वय 32, मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अ‍ॅड. उमेश चंद्रशेखर मोरे (वय 33, रा. धनकवडी) असे खून झालेल्या वकिलाचे नाव आहे.

जमिनीच्या वादातून अ‍ॅड. उमेश मोरे यांचे 1 ऑक्टोबरला शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांचा खून करुन मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ताम्हिणी घाटात टाकण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पसार झाले. त्यातील एका आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी मोबाईल ट्रकमध्ये टाकून दिला होता. पोलिसांनी तपास करुन एका आरोपीला पकडले. त्यानंतर दोघांना पकडण्यात आले. या खुनाच्या गुन्ह्याबाबत अधिक माहिती देणे पोलीस अधिकाऱ्यांनी टाळले आहे. आरोपी कपिल फलके आणि शेंडे यांच्यावर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. रोहित शेंडे याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यातंर्गत लाचेचा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये मयत अ‍ॅड. उमेश मोरे तक्रारदार होते.

आपली प्रतिक्रिया द्या