पुणे – भेकराईनगरमध्ये टोळक्याचा राडा, एकावर कोयत्याने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्चस्वाच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनामध्ये धरून आठ जणांच्या टोळक्याने तरूणावर कोयत्याने वार केले. त्याशिवाय हातातील कोयते फिरवून परिसरात दहशत पसरविली. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद केली. ही घटना बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फुरसुंगीतील भेकराईनगरमध्ये घडली. या प्रकरणी रोहित इंगळे (वय – 20, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी रोहित आणि टोळक्यातील एकाची वर्चस्वाच्या वादातून भांडणे झाली होती. त्याचा राग मनामध्ये धरून आरोपीने रोहितला भेकराईनरमधील एटीएमसेंटमरध्ये गाठले. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.

‘हातातील कोयते फिरवून आम्ही कोणालाही जिवंत सोडणार नाही’, असे ओरडून दहशत पसरविली. त्यामुळे घाबरून दुकानदारांनी आपआपली दुकाने बंद केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करीत आहेत.