डॉक्टरांना ब्लॅकमेल करणाऱ्या मोक्यातील फरार महिलेसह दोघांना अटक

crime

शहरासह जिल्ह्यातील प्रतिष्ठीत डॉक्टरांना लक्ष्य करून त्यांना ब्लॅकमेल करीत खंडणी उकळणाऱ्या मोक्यातील फरार सराईत महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट पाचने अटक केले. मागील 10 महिन्यांपासून दोघेही पोलिसांना गुंगारा देत होते. रंजना तानाजी वणवे (वय 38) आणि सागर दत्तात्रय राउत (वय 24) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

रंजना वणवे सराईत गुन्हेगार असून तिने खंडणी उकळण्यासाठी स्वतंत्र टोळी तयार केली होती. संबंधित टोळी शहरासह ग्रामीण भागातील प्रतिष्ठीत डॉक्टरांना लक्ष्य करीत होती. त्यानंतर डॉक्टरांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचे काम करीत होते. संबंधित महिलेविरूद्ध सोलापूरमध्ये मोकानुसार कारवाई करण्यात आली होती. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर तिने पुन्हा डॉक्टरांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्यास सुरूवात केली होती.

त्यामुळे तिच्याविरूद्ध मोकानुसार कारवाई करण्यात आली. मात्र, तेव्हापासून रंजना साथीदारासह फरार झाली होती. ती फलटणमध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनीट पाचने सापळा रचून महिलेसह दोघांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, प्रमोद टिळेकर, महेश वाघमारे, विनोद शिवले, दया शेगर, स्वाती गावडे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या