
जमीनीची मोजणी करण्यासाठी फी भरलेली असतानाही 50 हजारांच्या लाचेची मागणी करणार्या शिरूर येथील भुमिअभिलेख उपधीक्षक कार्यालयातील भुकरमापकासह शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) गुन्हा दाखल केला आहे.
भुमिअभिलेखचा भुकरमापक रविंद्र नारायण शेळके (वय 29) आणि शिपाई दिपक शिवराम ताजणे (वय 40) या दोघांवर एसीबीने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.
तक्रारदारांनी जमीन मोजणीसाठी पैसे भरले असताना देखील भुकरमापक त्यांच्याकडे लाचेची मागणी करत होता. परंतु, तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे धाव घेऊन तक्रार दिली होती. त्या आधारावर एसीबीने पडताळणी केली होती. त्यामध्ये शेळके आणि त्याचा सहकारी ताजणे लाच मागताना आढळले. त्याच आधारावर हा गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी करत आहेत.

































































