
मोटार पुढे जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या रागातून टोळक्याने टेम्पो चालकाला रॉडने बेदम मारहाण करीत खुनी हल्ला केला. ही घटना 25 नोव्हेंबरला सायंकाळी पावणेसातच्या सुमारास कात्रज चौकात घडली. याप्रकरणी एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
संदीप नरसिंग चव्हाण (23, रा. धायरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे तीन साथीदार पसार झाले आहेत. आदिनाथ जाधव (45, रा. कोंढवा बुद्रुक) असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिनाथ टेम्पोचालक असून 25 नोव्हेंबरला ते कात्रजकडे निघाले होते. त्यावेळी मोटारचालक संदीपने त्यांना लाईट चमकवून पुढे जाण्यासाठी इशारा केला, मात्र कात्रज चौकात सिग्नल लागल्यामुळे आदिनाथने टेम्पो थांबविला. याचा राग आल्यामुळे आणि रस्ता न दिल्यामुळे संदीपने मोटारीतून उतरून आदिनाथला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांच्या टेम्पोच्या वायफरचे नुकसान केले. इतर साथीदारांनीही आदिनाथला मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करीत आहेत.


























































