तक्रार मागे घेण्यासाठी एकावर कोयत्याने वार, हडपसरमधील काळेपडळ येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तक्रार मागे घेण्यासाठी टोळक्याने एकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने वार केला. ही घटना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. याप्रकरणी डब्लुसिंग पंजाबसिंग टाक (वय 31) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या साथीदारांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू माने (वय 53) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू माने यांचा मुलगा आणि आरोपी डब्लूसिंग यांच्यात काही महिन्यांपुर्वी वादावादी झाली होती. त्यामुळे राजू यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा राग मनामध्ये धरून आरोपींनी काल दुपारी राजूला काळेपडळ परिसरात गाठले. तुझ्या मुलाने आमच्याविरूद्ध दिलेली तक्रार मागे घे, असे म्हणत आरोपींनी राजू यांना मारहाण करून कोयत्याने वार केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करीत आहेत.