
सराईत गुंडाचा खून झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेत दुचाकी फेरी काढून दहशत करणाऱ्या बिबवेवाडीतील बापू नायर टोळीचा म्होरक्या कैलास माने याला गुन्हे शाखेने भिगवण परिसरातून अटक केली. गुंडाच्या अंत्ययात्रेत 100 ते 125 जण सामील झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक केली होती. तेव्हापासून कैलास माने पसार झाला होता.
बिबवेवाडी परिसरात स्रेत गुंड माधव वाघाटे याचा खून झाला होता. 16 मे रोजी वाघाटेची अंत्ययात्रा काढण्यात आली. कात्रज स्मशानभूमीपर्यंत दुचाकीवरून 100 ते 125 जण अंत्ययात्रेत सामील झाले होते. दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होती. या प्रकरणात कारवाई करण्यात आल्यानंतर बापू नायर टोळीतील गुंड कैलास महादेव माने (वय 30, रा. गुलमोहोर अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) पसार झाला होता. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले होते. माने भिगवण परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय थोरात, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर यांनी सापळा रचून त्याला अटक केली.

























































