
शहरातील नदीपात्रात तरूणाला धमकावून त्याच्याकडील मोबाइल हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. मंगेश शैलेश काकडे (वय 21, रा. जुना तोफखाना, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत भिले (वय 20, रा. कसबा पेठ) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भिले दोन दिवसांपूर्वी मित्राला भेटण्यासाठी डेंगळे पुलाजवळ गेले होते. त्यावेळी काकडे आणि त्याच्या बरोबर असलेल्या दोघांनी भिलेला धमकावून त्याच्याकडील मोबाइल हिसकावून नेला. पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. भिले याने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर काकडेला पोलिसांनी अटक केले. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.
























































