
पूर्ववैमनस्यातून दोघा अल्पवयीनांसह तिघांनी मिळून एका सराईतावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री कोंढवा भागात घडली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने आरोपीला अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
तोहीद समीर शेख (22, रा. कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, सुमित उर्फ मोन्या काकासाहेब जाधव (25, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. मयत जाधव आणि आरोपींमध्ये वाद होते. यातूनच तिघांनी मिळून मंगळवारी रात्री शितल पेट्रोलपंपाशेजारील सर्व्हिस रस्त्यावर जाधव याला अडविले. त्याच्यावर वार करून त्याचा खून केला. यानंतर आरोपी पसार झाले.
माहिती मिळताच गुन्हे शाखेची पथके आरोपीच्या मागावर होती. यादरम्यान आरोपी हे डेक्कन परिसरातील झेड पुलाखाली असल्याची माहिती गुन्हे शाखा यूनिट पाचचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट पाचचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, अंमलदार राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, दाउत सय्यद, विलास खंदारे, दया शेगर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली

























































