धक्कादायक; अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न एका शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे टळला आहे. पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे हा प्रकार घडला असून याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोडीतील परिसरात दुचाकीवरून आलेले दोन तरुण एका नवजात अर्भकाला जिवंत पुरणाचा प्रयत्न करत होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी हा प्रकार पहिल्यानंतर त्यांनी दोघांना हटकले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणांनी अर्भक तिथेच टाकून पळ काढला आहे. नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अर्भक जेजुरी रुग्णालयात दाखल केले.

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोडी येथील एका शेतामध्ये दोन तरुण खड्डा खोदत होते. परिसरातील शेतात काम करणारे काही लोक या ठिकाणी आले असता त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी तरुणांना लांबूनच काय करताय? असे विचारले. त्यामुळे घाबरलेल्या दोघांनी अर्भकाला टाकून मात्र पळ काढला. पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेतले असून त्याला जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथील तपासणी नंतर या अर्भकाला पुणे येथे ससून रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. अधिक तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके करीत आहेत.