दांडियात हुल्लडबाजांना बजावल्याने दोघांवर कोयत्याने वार, बिबवेवाडी भागातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दांडियात हुल्लडबाजी करणाऱ्यांना समज दिल्याने टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना बिबवेवाडी भागातील सुखसागरनगर परिसरात घडली. तुषार कदम (वय – 33, रा. सुखसागरनगर, कात्रज) आणि त्याचा मित्र योगेश दत्तात्रय नाईकडे (वय – 38) यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. याप्रकरणी तुषार कदम यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त सुखसागरनगर भागात दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तिघे जण दांडियात हुल्लडबाजी करुन त्रास देत होते. त्यामुळे कदम आणि नागरिकांनी तिघांना समज दिली. दांडियात हुल्लडबाजी करु नको, असे सांगून जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तिघे जण सुखसागरनगर भागातील श्री एकमुखी दत्त मंदिर परिसरात आले. त्यांनी तुषार कदम आणि त्याचा मित्र योगेश दत्तात्रय नाईकडे (वय – 38) यांच्यावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती बिबवेवाडी पोलिसांनी दिली.