
मोटारीतून मुंबईला जाणाऱ्या वृद्ध महिलेला चालकाने पुढे पोलीस आहेत, असे सांगत मी पेट्रोल पंपावरून डिझेल भरून येतो, असे म्हणून तिला खाली उतरविले आणि मोटारीतील तिचे दागिने आणि रोकड असा दीड लाखाचा ऐवज घेऊन मोटारचालक पसार झाला. ही घटना वाकड येथे घडली. सजरूननिसा हाफीजउल्ला खान (वय 65, रा. आंबेगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अब्दुल्ला असे गुन्हा दाखल केलेल्या मोटार चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सजरूननिसा या 9 मे रोजी सकाळी मोटारीतून (एमएच 46, पी. 7271) मुंबईला निघाल्या होत्या. कात्रज – देहूरोड बाह्यवळण महामार्गाने जात असताना वाकड येथे चालक अब्दुल्ला याने मोटार थांबविली. पुढे पोलीस आहेत, असे सांगत मी पेट्रोल पंपावरून डिझेल भरून येतो, असे म्हणून सजरूननिसा यांना रस्त्याकडेला खाली उतरविले आणि मोटारीतील त्यांच्या बॅगेतील 30 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने, 28 हजाराची रोकड, कागदपत्रे, कपडे असा 1 लाख 55 हजार रूपये किमतीचा ऐवज घेऊन मोटारचालक पसार झाला. फौजदार एम. डी. वरूडे तपास करत आहेत.

































































