रवींद्र बऱ्हाटेचे ‘नऊ फॉलोअर्स’ गुन्हे शाखेच्या रडारवर, पुणे पोलिसांकडून कारवाईसाठी हालचाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोक्कातील फरार असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या गुन्हे शाखेने मंगळवारी मुस्क्या आवळल्या आहेत. त्यानंतर आता पोलिसांकडून त्याच्या सोशल मीडियाचा धांडोळा घेतला जात आहे. त्यानुसार बऱ्हाटेच्या पोस्टला लाईक करणे, प्रत्येक व्हिडीओ पाहणे, सातत्याने त्याचे फेसबुक पेज उघडणाऱ्यांची कुंडली तपासण्यात येत आहे. सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून 9 जणांकडून बऱ्हाटेला सातत्याने फॉलो केले जात होते. त्यानुसार गुन्हे शाखेकडून संबंधितांची माहिती गोळा केली जात आहे. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

नागरिकांची फसवणूक करून त्यांची जमीन बळकाकविणे, धमकी देउन प्रॉपर्टी स्वतःसह टोळीच्या नावावर करून घेणे, धमक्यांना भीक न घालणाऱ्यांना थेट गोळ्या घालण्याचा इशारा देणे, बदनामी करणे यासह संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी रविंद्र बऱ्हाटे याला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. त्यानंतर आता गुन्हे शाखेकडून बऱ्हाटेचा सोशल मीडिया हँडल करणारे लोक, छुप्या पद्धतीने फोनवर संपर्क साधणारे, त्याशिवाय त्याने फेसबुकवर अपलोड केलेले व्हिडिओ वारंवार पाहून लाईक करणाऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यांच्यावर वॉच ठेउन कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव झाल्यानंतर बऱ्हाटेच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात पोलिसांना यश आले. काही दिवसांपुर्वी त्याने फेसबुकवर व्हिडिओ प्रसारित करून पोलिसांवर आरोपी केले होते. त्यानंतर बऱ्हाटेला मदत करणाऱ्यांचा ठावठिकाणा शोधण्यास पोलिसांनी सुरूवात केली होती. त्यानुसार कटात सहभागी असलेल्या बऱ्हाटेची पत्नी संगीता आणि मुलगा मयूरला अटक केली. चौकशीत फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडीओसंदर्भात महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर अ‍ॅड सुनील मोरे यांनीही अटक करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी गुन्हे शाखेने बऱ्हाटेला अटक केली.

पोस्टला लाईक आणि शेअर भोवणार

बऱ्हाटेने फेसबुकवरकाही दिवसांपुर्वी पहिल्यांदा व्हिडीओ अपलोड केला. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याच्या संपर्कात असलेल्यांची माहिती गोळा करण्यास आली. त्यामध्ये सर्व व्हिडीओ व ऑडीओ तयार करून प्रसारीत करण्याच्या कामात आरोपी पितांबर धिवार याने बऱ्हाटेला मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे त्याला अटक केली. दरम्यान, बऱ्हाटेने फेसबुकवर अपलोड केलेले व्हिडीओ सातत्याने पाहणे, लाईक आणि शेअर करणाऱ्यांची संख्या 9 वर पोहोचली होती. त्यामुळे बऱ्हाटे आणि संबंधित 9 फॉलोअर्स यांचा संबंध काय होता, याची तपासणी गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.