गिफ्टच्या बहाण्याने महिलेला 5 लाखांचा गंडा

crime

अमेरिकेतून गिफ्ट पाठवित असल्याची बतावणी करून सायबर चोरट्याने महिलेला 5 लाखांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना जून ते ऑगस्ट 2020 कालावधीत घडली. याप्रकरणी 47 वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला कॅम्प परिसरात राहायला आहे. जून 2020 मध्ये एकाने त्यांना फोन करून विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांच्यासोबत मैत्री करून अमेरिकेतून गिफ्ट पाठवित असल्याची बतावणी केली. त्यासाठी विविध कर लागणार असल्याचे सांगून सायबर चोरट्याने महिलेकडून ऑनलाईनरित्या 5 लाख रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली. गिफ्ट न आल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेउन तक्रार केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जांभळे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या