कोथरूड – मद्यपींना जाब विचारल्यामुळे माजी आमदारांना धक्काबुक्की, दोघे जेरबंद

2842

कोथरूडमधील सहजानंद सोसोयटीजवळ दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांना जाब विचारल्याचा राग आल्यामुळे त्यांनी भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की केली. यामुळे त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोपीनाथनगरमधील सोसोयटीजवळ घडली. अमर सयाजी बनसोडे आणि विनोद सुरेश गद्रे अशी जेरबंद केलेल्याची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. मानसी राहुल कोल्हे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास कोथरूडमधील सहजानंद सोसायटीच्या आवारात चार तरुण मद्यपान करीत बसले होते. त्यामुळे तेथून जाणाऱ्या विलास कोल्हे यांनी त्यांना जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे अमर आणि विनोद यांच्यासह इतर दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे मानसी आणि त्यांचे पती राहुल त्याठिकाणी येऊन भांडणे सोडविण्याचा प्रयन्त केला असता, चौघांनी त्यांनाही मारहाण केली.

आरडाओरडा झाल्यामुळे तेथेच राहायला असलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी उपस्थित चौघांना काय झाले, अशी विचारणा केली. तेव्हा चौघांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. त्यामुळे त्यांच्या हाताच्या बोटांना किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघाना जेरबंद केले आहे. कोथरूड परिसरातील सहजानंद सोसायटी आवारात मागील काही दिवसांपासून मद्यपींचा मोठा त्रास होत असून यासंदर्भात वेळोवेळी पोलिसांना माहिती दिली जात आहे. मात्र, पोलिसांकडून वेळीच दखल घेतली जात नसल्याचे माजी आमदार कुलकर्णी यांनी सांगितले.

सहजानंद सोसायटीच्या आवारात घडलेल्या घटनेनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले होते. त्याठिकाणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी कोल्हे कुटुंबातील सदस्यांना मारहाण झाल्याची तक्रार मानसी कोल्हे यांनी दिली आहे. इतर कोणीही तक्रार दिली नाही.
-अमर घोडके, पोलीस उपनिरीक्षक, कोथरूड

सहजानंद सोसायटी परिसरात दिवसाढवळ्या दारू पिऊन धिंगाणा घातला जात आहे. वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार दिली असताना, कारवाई केली जात नाही. पेट्रोलिंग केले जात नसल्यामुळे मद्यपीचे फावले आहे. काल सोसायटीजवळ झालेल्या घटनेची माहिती घेताना, मला मद्यपीनी धक्काबुक्की केली. तक्रारीला राजकीय स्वरूप दिले जाऊ शकते, म्हणून मी पोलीसांकडे तक्रार केली नाही.
– मेधा कुलकर्णी, माजी आमदार, कोथरूड

आपली प्रतिक्रिया द्या