
महाराष्ट्र सरकारने राज्य पोलीस दलासाठी तब्बल 18 हजार पदांची घोषणा केली आहे. त्यातील पुणे पोलीस दलातील हवालदार व वाहन चालक पदासाठी नुकतेच अर्ज मागवण्यात आले होते. या पदासाठी कमीत कमी बारावीपर्यंतचे शिक्षण असणे अपेक्षित होते. मात्र त्यासाठी आलेल्या अर्जांमधील अर्जदारांचे शिक्षण पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. चक्क होमियोपॅथी डॉक्टर, इंजिनियर, एमबीए अशा मोठ मोठ्या पदव्या असलेल्या तरुणांनी देखील या पदांसाठी अर्ज केले आहेत.
पुणे पोलीस दलातील या भरतीसाठी तब्बल 73,242 अर्ज आले असून त्यातील 3238 अर्ज हे उच्च शिक्षितांचे आहेत. यातक बहुतांश मास्टर्स, पदवीधर, सायन्स पदवीधर, कॉम्प्य़ुटर सायन्स, लॉ, मॅनेजमेंटच्या, होमियोपॅथी व आयुर्वैदीक डॉक्टर, इंजिनियर अशा पदव्या घेतलेल्या तरुणांचे अर्ज आहेत.
सरकार नोकरीतील स्थैर्य व वेळेनुसार परिक्षा देऊन मिळत जाणारे प्रमोशन यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरुण हे सरकारी नोकऱ्यांना प्राधान्य देत आहेत. ”अनेक तरुण हे आजही सरकारी नोकऱ्यांच्या मागे धावतात. या नोकऱ्या त्यांना एक सुरक्षित आयुष्याची हमी तर देतातच सोबत अनेक सोयीसुविधाही मिळतात. घर, वैद्यकीय सुविधा मिळतात. प्रायव्हेट नोकऱ्यांप्रमाणे नोकरी गमावण्याची भीती नसते. तसंच इथे परिक्षा देऊन तुम्ही लवकरात लवकर प्रमोशन मिळवू शकता”, असे आझम कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राध्यापक अजाझ भगवान यांनी टाईम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले.


























































