
दुचाकीवर आलेल्या तिघांनी किराणा दुकान मालकावर गोळीबार केल्याचे उघडकीस आले आहे. काल रात्री पावणे नऊच्या सुमारास आंबेगाव खुर्दमधील दत्तनगरमध्ये घडली होती. दुकानदारावर गोळीबार का करण्यात आला, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. आरोपींचा तपास सुरू असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.
विशाल पंजाबी असे जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीवरील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेगाव खुर्द येथील शिवांजली गल्लीत पंजाबी यांचे बालाजी ट्रेडींग कंपनी नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास तिघेजण दुचाकीवर आले होते. विशाल यांनी त्यांना काय पाहिजे अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी पिस्तूलातून विशालवर गोळीबार केला. एक गोळी विशाल यांच्या डोक्याला चाटून गेली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.



























































