
चतुशृंगी परिसरात दहशत माजवत वाहनांची तोडफोड करून रिक्षा चालकाला लुटणाऱ्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. त्यातील 5 जणांना अटक केली आहे.
जयेश विजय लोखंडे (वय 20, रा. जुना बाझार), निखिल विजय कुसाळकर (वय 22, रा. दीप बंगला चौक), रोहित सुरेश धोत्रे (वय 21, रा. जुनी वडारवाडी), सुबोध अजित सरोदे (वय 20, रा. पांडवनगर) व जितेंद्र संजय जंगम उर्फ गोहिरे (वय 31, रा. पांडवनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
चतुःशृंगीत गेल्या आठवड्यात मध्यरात्री यातील 35 वर्षीय रिक्षा चालक घराबाहेर लावलेल्या गाडीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी हातात कोयते, गज, काठ्या घेऊन टोळके आले. त्यांनी फिर्यादी यांना धमकावत तुझ्याकडे इतक्या गाड्या आहेत, तू आम्हाला हप्ता द्यायचा. आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत बेदम मारहाण केली. तर त्यांच्या खिशातील 5 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली.
याप्रकरणी त्यांनी चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी या पाच जणांना अटक केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार टोळीवर मोक्कानुसार कारवाई केली आहे.



























































