चोराने 35 व्या वर्षी केली फसवणूक, 54 व्या वर्षी झाली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

चोर कितीही हुशार असला, तरी पोलिसांच्या तपासापुढे शून्य ठरत असल्याचे दिसून आले आहे. नोकरीच्या आमिषाने तरुणांना दीड लाखांचा गंडा घालून फरार झालेल्या उच्चशिक्षित चोरट्याला गुन्हे शाखेने तब्बल 19 वर्षांनी अटक केले आहे. त्यामुळे कानून के हात लंबे असल्याचे सिद्ध झाले आहे. सतीश दशरथ हळदणकर (वय 55 रा. वानवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रफुल्ल शंकर गायकवाड वय आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीशने एप्रिल 2001 मध्ये प्रफुल्ल गायकवाड आणि इतर पाचजणांना मुंबईतील सहारा एअरपोर्ट येथे क्लार्क म्हणून नोकरी लावण्याचे आमीष दाखविले होते. त्यासाठी त्याच्याकडून 1 लाख 53 हजार रुपये घेत निवडीचे बनावट नियुक्तीपत्र दिले. मात्र, पत्र बनावट असल्याचे प्रफुल्ल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर सतीश फरार झाला होता. मागील 19 वर्षांपासून तो पोलिसांना सापडत नव्हता. दरम्यान, काही दिवसांपुर्वी सतीश त्याच्या आजारी आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी महेश निंबाळकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महेश निंबाळकर यांच्या पथकाने केली.

देशभरात फसवणूक केल्याचा संशय

आरोपी सतीशने देशभरातील विविध ठिकाणी जाउन नागरिकांना मोठ्या पदावर नोकरीला लावण्याच्या आमिषाने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. त्यामध्ये दिल्ली, मध्यप्रदेश, हैद्राबाद, गोवा सिंधुदुर्ग, संभाजीनगर, मुंंबई, नगर, नाशिक, नागपूरमधील ठिकाणांचा समावेश आहे.

अशी करीत होता फसवणूक

सतीश उच्चशिक्षित असून त्याने बीएस्सी पर्यंत शिक्षण घेतले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये जाउन तो भाडोत्री घर घेत होता. त्यानंतर मोठ्या पदावर नोकरी लावण्याची जाहिरात करुन बेरोजगारांना जाळ्यात ओढीत होता. त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे घेउन दिल्लीत बोलावून घेत होता. त्यानंतर संबंधितांना बनावट नियुक्ती पत्रक देउन दुसऱ्या शहरात पळून जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.