
‘आज रविवार आहे, उद्या या’, असे म्हणत तक्रारीसंदर्भात चौकशी करण्यास आलेल्या तरुणीला मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारीचे निलंबन करण्यात आले आहे. ज्योती कुतवळ ( नंबर 8081) असे निलंबन करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.
कुतवळ या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांची नेमणूक सेवा विभागाला करण्यात आली होती. त्यावेळी एक तक्रारदार तरुणी आई बेपत्ता असल्याच्या तक्रारी संदर्भात विचारणा करण्यास आली होती. त्यावेळी तरुणीला पोलीस महिला कर्मचारी असलेल्या कुतवळ यांनी, ‘आज रविवार आहे, तुम्ही उद्या या. आज पण डोके खाणार आणि उद्या पण डोके खाणार’, असे म्हणत त्यांना परत पाठविण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने तपास कोणाकडे आहे त्यांचा नंबर द्या असे म्हणाली. त्यावेळी कुतवळ यांनी अपशब्द वापरत त्यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. याबाबत तरुणीने तक्रार केल्यानंतर याची चौकशी झाली. त्यानंतर कुतवळ यांचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अपशब्द वापरल्या प्रकरणी कुतवळ यांचे निलंबन करण्यात आले होते. त्याकाळात त्यांना स्वारगेट पोलीस ठाण्यात हजर करून घेण्यात आले होते. पण तेथेही असेच घडत असल्याने त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात त्यांना पाठवून हजर होण्यास सांगितले होते. मात्र त्यांच्याकडून वारंवार अशा प्रकारचे वर्तन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे.


























































