पुण्यात सराइत टोळीला अटक, 33 मोबाइल जप्त

सिंहगड रस्त्यावरील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केले. त्यांच्याकडून 33 मोबाइल आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळून 2 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

साहिल दिलीप सांबरे, सूरज रवींद्र जाबरे, सोमेश्वर भानूदास गायकवाड, कृष्णाकुमार चव्हाण, तेजस पवारसह अल्पवयीन मुलाला अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस  हवालदार संतोष क्षीरसागर यांना सिंहगड रस्त्यावरील ज्वेलर्समध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून साहिल, सूरज, सोमेश्वर,भानूदास, कृष्णाकुमार, तेजसला ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी आणि 6 चोरलेले मोबाईल असे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. उर्वरित 27 मोबाईल त्यांनी पर्वती दर्शन आणि दत्तवाडीतून चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, मच्छिंद्र वाळके, रामदास गोणते, संतोष क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

चार्जिंगला लावलेले मोबाईल करायचे चोरी

पर्वती दर्शन आणि दत्तवाडी परिसरातून सराईत टोळी मोबाइलची चोरी करीत होते. नागरिकांनी घरात चार्जिंगला लावलेले मोबाइल चोरी करण्यात टोळीचा हातखंडा आहे. त्याशिवाय उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून मोबाइल लंपास करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दत्तवाडी आणि पर्वती दर्शन परिसरातील ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत, त्यांनी खडकीतील गुन्हे शाखेच्या कार्यालयात भेट देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या