हॉटेलमधील डीजेच्या दणदणाटाविरूद्ध कारवाईचा बडगा कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत रात्री दहानंतरही डीजे आवाजाचा दणदणाट करणार्‍या शहरातील विविध हॉटेल मालक-चालकांविरूद्ध सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरेगाव पार्कमधील अलिशान हॉटेलसह पब, रेस्टॉरंट बारमध्ये मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवून नागरिकांना मनस्ताप ठरणार्‍यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांचे हॉटेलमधील 2 लाख 70 हजारांचा साउंड मिक्सर जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे.

कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल आणि पबमध्ये रात्री दहानंतरही साउंड सिस्टीमवर मोठयाने संगीत वाजवले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने 23 नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास पब्लीक रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बारवर कारवाई केली. संबंधित हॉटेलमधून 2 लाख 70 हजारांची साउंड सिस्टीम जप्त केली. त्यांच्याविरूद्ध ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, इरफान पठाण, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे यांनी केली.

11 लाखांवर किंमतीची साउंड सिस्टीम जप्त

रात्री दहानंतरही ध्वनी प्रदुषण करणार्‍या हॉटेल चालकांविरूद्ध सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार मागील आठवड्याभरात कोंढवा परिसरातील सिल्व्हर स्पुन हॉटेल, विमानतळ परिसरातील 3 मस्कटेअर्स, कोरेगाव पार्क परिसरातील कोरा कॉकटेल बार अ‍ॅण्ड किचन, बंडगार्डन परीसरातील मिलर्स लक्झरी क्लब, वन-8 कम्युनबार, कोरेगाव पार्क परिसरातील पब्लीक रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार हॉटेलवर कारवाई करुन 11 लाख 40 हजारांची साउंड सिस्टीम जप्त केली आहे.

शहरातील काही भागात हॉटेल व्यावसायिकांकडून रात्री उशिरापर्यंत साउंड सिस्टीम वाजविली जात होती. त्याअनुषंगाने प्राप्त तक्रारींची दखल घेउन नियमभंग करणार्‍यांविरूद्ध कारवाई केली जात आहे. रात्री दहानंतर ध्वनीप्रदुषण करणार्‍यांविरूद्ध कारवाईचा बडगा कायम ठेवला जाणार आहे.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर