
शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसिंगवर विशेष भर देण्यात येणार आहे. विशेषतः पुणे शहर खूप चांगले असून आयटी हब, सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. दरम्यान वाहतूककोंडी सोडविणे, सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करणे, संबंधित विभागाला आवश्यक मनुष्यबळ पुरविणे, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नियोजन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे. पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रतात ते बोलत होते. यावेळी सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे उपस्थित होते.
रितेशकुमार म्हणाले, पुणे शहर आयटी हब म्हणून वेगाने वाढले आहे. शाळा, महाविद्यालय, सांस्कृतिकपणाही शहराने जपला आहे. दरम्यान, वाढती लोकसंख्या, ठाण्यातंर्गत अपुरे मनुष्यबळ, गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे बेसिक पोलिसिंग करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आता नव्याने नियोजन करण्यात येत असून महिला सुरक्षितता, रस्त्यांवरील वाढते गुन्हे, सायबर फ्रॉड रोखण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः सायबर गुन्हे वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर संबंधित विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार आहे. सायबर नवनवीन गुन्ह्यांच्या मोडस ऑपरेंडीबाबत अधिकार्यांसह कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याद्वारे गुन्ह्यांच्या उकलीचा आलेख वाढणार आहे.
संघटित गुन्हेगारांविरूद्ध मोक्का कारवाईचा बडगा कायमस्वरूपी तशाच पद्धतीने ठेवण्यात येणार आहे. भाईगिरी-दादागिरी करणार्यांविरूद्ध एमपीडीएनुसार कारवाई, अल्पवयीन गुन्हेगारांच्या वाढत्या प्रस्थाला आळा घालणे, सीसीटीएनएस अपडेट करून आराखडा बनविणे, गल्ली-बोळात पेट्रोलिंग वाढविण्यासाठीही सर्व ठाण्यांना सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या प्रश्नांसह अडचणींची तक्रार अर्जाप्रमाणेच दखल घेतली जाणार आहे. त्यानुसार तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यात एकट्या राहणार्या जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही पोलिसांकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी माझ्या कार्यालयाचा दरवाजा कायम उघडा असल्याचा विश्वास रितेशकुमार यांनी दिला आहे.
वाहतूककोंडी सोडविण्याचे आव्हान, टोईंगव्हॅन रडारवर
वाहतूककोंडी सोडविण्याचे मोठे आव्हान आमच्यावर आहे. त्यावर प्राधान्याने विचार करून विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहे. दरम्यान, टोईंग व्हॅनद्वारे उचलण्यात येणारी वाहने, व्हॅनमधील सीसीसीटीव्ही, अद्यावयात नोंदी तपासणी केली जाणार आहे. त्याशिवाय व्हॅनमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणार्यांनी बेशिस्तपणे वागू नये, नागरिकांसोबत सुसंवाद ठेवावा, अन्यथा संबंधितांविरूद्ध कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आयुक्त रितेश कुमार यांनी दिला आहे.


























































