पुणे पोलीस दलातील 5 हजार 129 जणांना कोरोना लस, लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे

कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार पुणे पोलीस दलातील तब्बल 5 हजार 129 पोलिसांना कोरोना लस देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, कोरोना कालावधीत रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या राज्यातील अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती.

कोरोना लसीकरणासाठी केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्यक्ष आघाडीवर (फ्रंटलाइन वर्कर) कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार लस उपलब्ध होताच शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करून पोलीस महासंचालक कार्यालयात पाठविण्यात आली होती. त्यानुसार लसीकरण सुरू झाल्यानंतर शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी 26 केंद्रे सुरू करण्यात आली. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील रुग्णालयासह वेगवेगळ्या केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात लसीकरण सुरळीत पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान शहरातील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांसह ऑनड्युटी लस घेउन कामाला प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. बहुतांश पोलिसांनी पोलीस ठाण्यांपासून जवळ असलेल्या केंद्रावर जाऊन लस घेतली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम नियोजनबद्धरीत्या राबविण्यात येत आहे.

लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे

पहिल्या टप्प्यातील लस दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र मोबाइलवर पाठविण्यात येणार आहे. लसीकरणाचा पहिला टप्पा येत्या काही दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. व्याधी असलेल्यांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लस घेण्याचे सुचविण्यात आले आहे.

शहर पोलीस दलातील 5 हजार 129 कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आल्याने पोलिसांचे मनोबल उंचावले आहे.

– स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, मुख्यालय पुणे

आपली प्रतिक्रिया द्या