
नवनाथ शिंदे
पुणे पोलिसांकडून आता ड्राय पंचनाम्याला विशेष प्राधान्य दिले जात असल्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी मदत होत आहे. गुन्हेगारांकडून दरोडा किंवा चोरीचा घटनाक्रम जशाचा तसा घडवून आणून सीसीटीव्हीमध्ये रेकॉडिंग केले जाते. त्याद्वारे संबंधित सीसीटीव्ही फुटेज वापरून गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा मिळवून डिजिटल फॉरेन्सिक पुरावे तयार केले जात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या टेक्नोसॅव्ही ड्राय पंचनाम्याचा दणका गुन्हेगारांना बसणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून मागील वर्षभरापासून ड्राय पंचनाम्याद्वारे आरोपींना शिक्षेसाठी प्रयत्न केले जात आहेत.
गंभीर गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटविण्यासाठी पुणे पोलिसांनी ड्राय डिजिटल पंचनामा अहवाल तयार करण्याचा निर्णय जुलै 2021 मध्ये घेतला होता. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मूळ फुटेज हस्तगत करण्यास सुरूवात केली. विशेषतः दरोडा आणि सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांविरूद्ध डिजीटल पुरावा तयार करण्यासाठी ड्राय पंचनाम्याचा पहिला प्रयोग करण्यात आला.
पाषाण परिसरात जेष्ठाची सोनसाखळी हिसकावणाऱ्या आरोपींची शहरातील 12 ठिकाणी सीसीटीव्हीमधील हालचाली नोंदविण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोघांनाही पुन्हाः पाषाण परिसरात नेऊन गुन्ह्याच्यावेळी परिधान केलेले कपडे घालायला दिले. मोटार सायकलवर बसवून सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली दुचाकी चालविण्यास भाग पाडून मूळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये आणि ड्राय पंचनामा फुटेजमधील संशयित व्यक्ती सारखेच दिसत असल्याची खात्री केली. त्यानंतर डिजीटल फॉरेन्सिक पुरावा तयार करून ड्राय पंचनाम्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला.
हडपसरनजीक मांजरी परिसरात दरोड्यात सहभागी असलेल्या दोन्ही संशयितांनी रात्रीच्यावेळी दरोडा टाकला होता. त्यांना अटक केल्यानंतर सबळ पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले होते. घटनाक्रम उभा करण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास संपूर्ण देखावा पुन्हा तयार करून आरोपींना सीसीटीव्ही परिसरात चालण्यास सांगण्यात आले. त्यानंतर आरोपींचे मुळ सीसीटीव्ही फुटेज आणि ड्राय पंचनाम्यातील रेकॉडिंगद्वारे पुरावे गोळा केले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले साहित्य, शस्त्र, दुचाकीचे हुुबेहुब चित्रीकरण करून पोलिसांनी ड्राय पंचनामा केला. दरम्यान, आरोपींचा दरोडा आणि इतर गुन्ह्यांमध्ये समावेश असल्याचे उघडकीस आले. त्याशिवाय त्यांनी शस्त्राच्या धाकाने तरूणाचा मोबाईल, रोख रक्कम आणि घड्याळ लुटले होते. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी सबळ पुरावे तयार करत ड्राय पंचानाम्याचे महत्व अधोरेखित केले आहे.
गंभीर गुन्ह्यात पुरावे गोळा करण्याचा नवा फ़ंडा
शहरातील विविध भागात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील डिजीटल पुरावे गोळा करण्यासाठी ड्राय पंचनामा केला जातो. संबंधित ड्राय पंचनाम्याची पद्धती नवीन असून राज्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेने केलेल्या पडताळणीनंतर संशयितांविरूद्ध पुरावे तयार केले जातात. दरम्यान, गुन्हेगारांची ओळख आणि ड्राय पंचनाम्यामुळे त्यांना दोषी ठरवले जाणार आहे. भविष्यातही ड्राय पंचनाम्याचा उपयोग वेगवेगळ्या गुन्ह्यातील डिजीटल पुरावे एकत्रित करण्यासाठी केला जाणार आहे.
गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यासाठी सबळ पुरावा उपलब्ध व्हावा, याहेतूने संबंधित घटनेचा ड्राय पंचनामा करण्यास सुरूवात केली. त्यानुसार सीसीटीव्हीतील मुळ फुटेज आणि ड्राय पंचनाम्याचे विश्लेषणाद्वारे आरोपींना शिक्षा होण्यास मदत होत आहे. दरम्यान, गंभीर गुन्ह्यात पुराव्यांअभावी आरोपींची सुटका होउ नये, यासाठी ड्राय पंचानाम्यातून डिजीटल पुरावे एकत्रित करण्यावर भर दिला जात आहे.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर





























































