पुणे – पोलिसांसाठी मुख्यालयातील हॉस्पिटलमध्ये 10 ऑक्सिजन बेड

पुणे शहरातील पोलीस दलामध्ये वाढत्या कोरोनाचा संसर्गामुळे शिवाजीनगर येथील पोलिस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याठिकाणी 10 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असून बाधित अधिकारी व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय सर्वप्रथम हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहेत.

रस्त्यावर काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाने बाधित होत आहेत. आतापर्यंत 2 हजार 59 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 272 पोलीस अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. पोलिसांना कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने कोविड सेलची स्थापना केली आहे.

संबंधित सेलमध्ये सहायक पोलिस आयुक्त, एक निरीक्षक व तीन उपनिरीक्षक व अंमलदार काम पाहत आहेत. सेल मार्फत पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली जात आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे स्वत: झुम मिटिंगद्वारे बाधितांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत

शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात स्वतंत्र पोलिसांचे हॉस्पिटल आहे. या ठिकाणी ऑक्सिजनची उपलब्धता नव्हती. पण आता मुख्यालयात पोलिस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याठिकाणी 10 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध आहेत. आणखी ऑक्सिजन सिलेंडर खाजगी कंपनीकडूनही घेण्यात येत आहे. त्याशिवाय बाधित अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय सर्वप्रथम शिवाजीनगर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केले जाणार असून त्यानंतर त्यांच्यावर आवश्यकतेनुसार सिंबायोसिस लवळे, जम्बो कोविड सेंटर, कमांड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी या हॉस्पिटलमध्ये पोलिसांसाठी काही बेड राखीव ठेवण्यात आले होते. ज्या पोलिसांची घरे छोटी असून कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त आहे व ते बाधित आहेत, अशांसाठी होम आयसोलेशयनची सुविधा वेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे.

आतापर्यंत 2 हजार 59 जणांना कोरोना, 13 पोलिसांचा मृत्यू

कोरोनामुळे शहर पोलिस दलात आतापर्यंत 2 हजार 59 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 13 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरी लाट आल्यापासून पुन्हा पोलिसांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले. सध्या 272 पोलीस अधिकारी व कर्मचारी उपचार करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पुन्हा सर्व पोलिसांच्या तपासण्या केल्या जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या