
नवनाथ शिंदे
पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित ठेवणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फेसबुकला सायबर चोरट्यांचे ग्रहण लागले आहे. संबंधितांचे फेसबुक खाते हुबेहुब तयार करून परिचयातील नागरिकांना थेट पैशांची मागणी केली जात असल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी खात्री केल्याशिवाय कोणालाही रक्कम वर्ग न करण्याचे आवाहन सायबर विभागाने केले आहे.
मोबाईलचा वाढत्या वापरामुळे तरुणापासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेक जणांकडून फेसबुक, इन्स्टाग्रामवर मैत्री करण्यास प्राधान्य दिले जाते. प्रत्यक्षात मात्र, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे काही पोलीस अधिकाऱ्यांना महागात पडल्याचे दिसून आले आहे. सायबर चोरट्यांकडून फेसबुकवर पोलिस अधिकाऱ्यांचा फोटो अपलोड बनावट प्रोफाईल तयार करून केला जातो. त्यानंतर संबंधितांच्या ओळखीतील नागरिकांना फ्रेड रिक्वेस्ट पाठवून बोलण्यास प्राधान्य दिले जाते. त्यानंतर स्वतःचा अपघात, परदेशात असल्याची बतावणी करून पैशांची मागणी केली जात आहे. समोरील व्यक्तीकडून खातरजमा न करता तत्काळ पैसे पाठविण्यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फेसबुक क्लोनिंग असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
फेसबुकवर बहुतांश पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची खाते आहेत. त्याद्वारे सायबर चोरट्यांकडून हुबेहुब अकाउंट तयार करून काही मित्रांना रिक्वेस्ट पाठविली जाते. त्यानंतर संबंधितांकडे पैसे मागितले जातात. पुण्यातील काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त आणि अपर पोलीस आयुक्तांचे फेसबुक क्लोन केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या नावाने पैशांची मागणी होण्याची शक्यता असल्यामुळे फेसबुक अकाउंट काही कालावधीसाठी बंद करण्यात आली होती. दरम्यान, सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांना सावधनता बाळगणे गरजेचे आहे. विशेषतः विविध अॅपद्वारे मैत्रीची भुरळ पाडली जात असल्याचे काही घटनांवरून उघड झाले आहे. त्यानुसार आपली खासगी माहिती, कौटुंबिक माहिती कोणालाही शेअर न करता सोशल मीडिया सुरक्षितता बाळगणे महत्वाची आहे.
नागरिकांनो फेसबुक वापरताना अशी घ्या काळजी
फेसबुकवर मित्र असलेल्यांची पुन्हा रिक्वेस्ट स्वीकारू नका
सोशल मीडियावरील ओळखीतून आर्थिक व्यवहार करू नका
खात्री केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करणे टाळा
फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार करा
फेसबुकवर बँकखात्याची गोपनीय माहिती कोणालाही देउ नका
सोशल मीडियावर कोणत्याही मदतीसंदर्भात भरोसा ठेउ नका
संशयास्पद फेसबुक खात्यांसदर्भात तक्रारी करा
सायबर चोरट्यांकडून फेसबुकद्वारे बनावट प्रोफाईल तयार करून पैशांची मागणी केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर तपास करून संबंधिताविरूद्ध कारवाई करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांनी कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापुर्वी खात्री करणे गरजेचे आहे. विशेषतः सोशल मीडियाद्वारे किंवा ऑनलाईन अॅपद्वारे कोणीही पैशांची मागणी केल्यानंतर, संबंधितांकडे प्रत्यक्षात किंवा फोनवरून खातरजमा करणे महत्वाचे आहे. त्यामुळे फसवणूकीचे प्रकार टाळण्यास मदत होणार आहे.
-भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त, आर्थिक व सायबर विभाग, पुणे






























































