
पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार संघटित गुन्हेगारी टोळ्यांसह भाईगिरी, दादागिरी करणाऱ्यांविरूद्ध थेट मोक्कानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याशिवाय सोशल मीडियाद्वारेही गुन्हेगारांनो येरवडा किंवा तुम्ही शहर सोडा अशाप्रकारच्या दमबाजीमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. मागील आठ महिन्यांत 38 गुन्हेगारी टोळींविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यातील 300 पेक्षा जास्त गुंडाची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
संघटित गुन्हेगारी टोळ्यांसह भाईगिरीला लगाम घालण्यासाठी पोलिसांकडून प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः भाईगिरीला भुरळून उदयाला येणाऱ्या रायझिंग स्टार्सना वठणीवर आणण्यासाठी समुपदेशनाचे डोस देण्यात येत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत संबंधितांची यादी बनवून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्याशिवाय मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा 24 गुन्हेगारांविरूद्ध एमपीडीए अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2020 पासून जून 2021 पर्यंतच्या कालावधीत 38 गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करून 300 पेक्षा जास्त गुंडाची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. केलेली कारवाई मागील 30 वर्षांच्या कालावधीत कधीही करण्यात आली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे .
पोलीस आयुक्तांकडून सोशल मीडियाचा पुरेपुर वापर
नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासह इतर सूचनांचे पालन करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे ट्वीटर अकाउंट सुपरफास्ट झाले आहे. त्याशिवाय गुन्हेगारांविरूद्ध कारवाईसह सोशल मीडियाद्वारे दमबाजी करण्यातही मागेपुढे पाहिले जात नसल्याचे दिसून आले आहे. विविध सामाजिक संदेशासह गुन्हेगारांना समजले अशा भाषेमध्ये इशारा देण्यात येत आहे. विशेषतः गुन्हेगारांनो येरवडा किंवा शहर सोडा या सोशल कॅम्पेनमुळे ट्वीटर अकाउंट चर्चेत आले आहे. त्याशिवाय पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर महत्वाचा ठरत आहे.
- कारवाईचा बडगा अन गुन्हेगार तुडवा
- मोक्कानुसार 38 टोळ्याविरूद्ध कारवाई
- आठ महिन्यात 300वर गुंडाची येरवड्यात रवानगी
- एमपीडीए कायद्यानुसार 24 गुन्हेगार स्थानबद्ध
- दरमहिन्याला 15 ते 20 सराईत तडीपार
शहरातील नागरिकांना भीतीमुक्त जीवन जगता यावे, यासाठी गुन्हेगारांविरूद्ध कडक कारवाई करणे महत्वाचे होते. त्यानुसार मोक्का, एमपीडीए कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मागील 30 वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक 38 गुन्हेगारी टोळ्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करून संदेश दिला आहे. त्याशिवाय सोशल मीडियाद्वारेही सराईतांना त्यांच्यात भाषेत उत्तर देण्यासाठी कॅम्पेन चालविले जात आहे.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर



























































