‘काय होतीस तू…’ म्हणत चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
protest-against-chitra-wagh

‘काय होतीस तू, काय झालीस तू…’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती विभागाने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात आज जोरदार निदर्शने केली. पुण्याच्या बालगंधर्व परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आणि महिलांनी चित्रा वाघ यांच्या प्रतिमेला जोडेही मारले. चित्रा वाघ हाय हाय अशा घोषणाही देण्यात आल्या.

चित्रा वाघ या आजकाल ‘विचित्रा’ झालेल्या आहेत. त्यांना भाजपमध्ये कोणतेही पद न मिळाल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं असून ते पद मिळवण्यासाठी त्या पीडित महिलेवर दबाव आणण्यासारखी कामे करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या आंदोलकांकडून करण्यात आला. वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

‘एक महिला असून महिलेवर होणारे अत्याचार तुम्ही समजू शकत नाही. चित्रा वाघ तुमचा धिक्कार आहे’, अशी प्रतिक्रिया एका आंदोलक महिलेनं दिली आहे.